चाळीसगावात फटाके फोडण्याच्या कारणातून हाणामारी
चाळीसगाव : येथील रेल्वे स्टेशन परिसरात अंगणात फटाके फोडण्याच्या कारणातून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी निलो शेख अंजू शेख (वय ३५, रा. आग्रा रोड, मालेगाव) ही महिला दिवाळीनिमित्त चाळीसगाव येथे वडिलांना भेटण्यास आली होती. १३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांची तसेच भावाची मुले घरासमोर अंगणात फटाके फोडत असतांना शेजारी राहणारे शेख गफ्फार शेख सत्तार याने ‘तुम्ही फटाके फोडू नका’, असे सांगत फिर्यादी यांच्या मुलास मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीच्या भावाने शेख गफ्फार यास ‘माझ्या भाच्यास का मारले’, असे विचारल्याचा राग येवून गफ्फार शेख व त्याच्या नातेवाईकांनी एकत्र येत शिवीगाळ करत शेख कलीम शेख सलीम यास दगडाने व चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी अँगलने निलो शेख यांच्या भावास मारत आसतांना त्यांनी तो पकडण्याचा प्रयत्न केला असता तो निलो शेख यांच्या डाव्या हातावर लागून हात फ्रॅक्चर होवून गंभीर दुखापत झाली.
याप्रकरणी निलो शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शेख गफ्फार शेख सत्तार, शेख सलमान शेख गफ्फार (दोन्ही रा. रेल्वे स्टेशन जवळ) व शेख सुलतान शेख रहेमान, शेख टिपू शेख जब्बार, शेख शाहरूख शेख रहेमान (सर्व रा. तहजीब उर्दु शाळेजवळ, चाळीसगाव) यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२६, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.