DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनपेक्षित निकालांमुळे राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेची उत्कंठा शिगेला

पाचव्या फेरीअखेर आंध्राचा इम्रान तर महाराष्ट्राची संनिद्धी भट आघाडीवर...

  •  ग्रँडमास्टर अभिजित कुंटेनी भरला खेळाडूंमध्ये जोश…
  • पालकांनी साधला अशोक जैन यांच्याशी मुक्तसंवाद…

 

जळगाव | प्रतिनिधी
 जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेल्या ४८ व्या मुलांच्या व ३९ व्या मुलींच्या गटातील सब ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचा काल चौथा दिवस होता. चौथ्या दिवशी पाचवी फेरी खेळवण्यात आली. मात्र स्पर्धेत सनसनाटी निकालांची परंपरा आजही कायम राहिली आहे. सकाळी खेळाच्या सुरुवातीलाच मुलांच्या गटातील पहिल्या पटावर आंध्राच्या इम्रानने अवघ्या १५ चालीतच हरयाणाच्या अर्शदीप वर विजय संपादन केला, दुसऱ्या पटावर पारस ने मोहऱ्यांची मारामारी करत डाव विरुद्ध उंटाच्या अंतिम स्थितीकडे नेत सहजपणे अनिर्णीत अवस्थेकडे झुकवला. त्याच बरोबर तिसऱ्या पटावरील सामन्यात महाराष्ट्राच्या कुशाग्रने काळ्या सोंगट्यानिशी खेळताना बेंको ओपनिंगचा वापर करत आपल्या हत्तीचे बलिदान देउन उंटाला ए ६ जागेवर आणले पण पुढे काळ्या हत्तीला ई ३ वर नेण्याची चूक त्याला खूप महागात पडली. डावाच्या अंतिम भागात देखील प्यादाला न मारल्यामुळे मयंक बरोबर डाव अनिर्णीत ठेवण्याची संधी देखील त्याला गमवावी लागली. चौथ्या पटावर कर्नाटकच्या अक्षतने खेळलेल्या निमझोविच लार्सन हल्ल्यापुढे मृत्युंजयला शरणागती पत्करावी लागली. पाचव्या पटावर प.बंगालचा सम्यक व तेलंगणाच्या पवन ने ५९ चालिमध्ये बरोबरी मान्य केली तर, सहाव्या पटावर ३.५ गुणांसह खेळत असलेल्या दिल्लीच्या दक्ष गोयल ने सुरवातीपासूनच आक्रमक चाली रचत उंटाचे बलिदान देऊन प्रतिस्पर्धी राजाचे संरक्षण भेदले, त्या वेगवान हल्ल्याला उत्तर देऊ न शकल्याने अदक बिवोर ने हार मान्य केली.

पाचव्या फेरी अखेर आंध्राचा फिडे मास्टर इम्रान ५ गुणांसह निर्विवादपणे आघाडीवर असून आसाम चा अग्रमानांकित मयंक, महाराष्ट्राचा पारस, दिल्लीचा दक्ष गोयल आणि कर्नाटकाचा अक्षत सुरेका साडे चार गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.

 

मुलींच्या गटात, पहिल्या पटावर महाराष्ट्राच्या संनीद्धी भट ने आंध्र प्रदेशच्या आमुक्ता गुंतकाचा पराभव करत आपले वर्चस्व कायम राखले. लंडन पध्दतीने झालेल्या या सामन्यात काळ्याचे  ई ६ मधील प्यादे खिळखिळे झाल्याने पांढऱ्या सैन्याने काळ्या सोंगट्याना बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले सरतेशेवटी डाव तांत्रिकदृष्ट्या सक्षम करत संनिद्धिने आपल्या नावावर केला.

दुसऱ्या पटावर उत्तर प्रदेशच्या शुभी गुप्ताने केरळच्या अनुपमा श्री कुमारचा स्लाव बचाव मोडून काढला तर तिसऱ्या पटावर जागृती कुमारी ने ‘ड’ पट्टीतील प्यादे पुढे न चालवल्याने सपर्या घोषला जिंकण्याची संधी प्राप्त झाली आणि याचा तिने पुरेपूर फायदा उचलत आपल्या वजिराची अचूक चाल खेळत सामना खिशात घातला. चौथ्या पटावर पांढऱ्या सोंगट्यानिशी खेळणाऱ्या उत्तराखंडच्या शेराली पटनाईक हीस अग्रमानांकित मृत्तिकाला हरवण्याच्या अनेक संधी प्राप्त झाल्या पण स्पर्धात्मक अनुभव कमी पडल्याने तिला बरोबरी स्वीकारावी लागली. पाचव्या फेरिअखेर संनिद्धी भट ५ गुणांसह आघाडीवर असून साडेचार गुणांसह शुभीं गुप्ता, सपर्या घोष द्वितीय स्थानांवर आहेत, ४ गुणांसह अजून ५ खेळाडू संयुक्तरित्या तृतीय स्थानावर आहेत.

दोन्ही गटातील पहिल्या १० डावांचे थेट प्रक्षेपण चालू असून प्रेक्षक तासनतास विविध चालिंचे विश्लेषण करण्यात गुंगून जात आहेत. स्पर्धेतील पाच फेऱ्या संपल्या असून अजून स्पर्धेतील ६ फेऱ्या शिल्लक आहेत.

 

 

खेळभावना सर्वाच्चस्थानी – अभिजीत कुंटे

स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सकाळी खेळाच्या सुरुवातीला, भारतीय राष्ट्रीय चेस संघाचे मुख्य निवडकर्ता, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व सहभागी खेळाडूंना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी सर्वांशी संवाद साधतांना म्हटले की, ‘मला आशा आहे की तुम्ही सर्व जैन इरिगेशन सिस्टीम लि. च्या आदरतीथ्याने नक्कीच आनंदी असाल, हे नयनरम्य आणि निसर्गरम्य वातावरण तुमची मानसिकता स्थिर ठेवण्यासाठी मदत करत असेलच. आपण नेहमी खेळभावना सर्वोच्च स्थानी कायम ठेवून स्पर्धा करत राहावे ज्यामुळे आपले व्यक्तिमत्वालाही त्याला लाभ होतो. यावेळी त्यांनी आपल्या लहानपणीची आठवण मुलांना सांगतांना म्हटले कि, आज सारख्या सुविधा आमच्यावेळी नव्हत्या. पण आमची जिद्द नेहमी पुढे जाण्याची होती. तुम्ही या सर्व सुविधांचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करावे. यासह त्यांनी सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

 

अशोक जैन यांच्याशी पालकांच्या दिलखुलास गप्पा…

 

पाचव्या फेरीला सुरुवात झाल्यानंतर स्पर्धेच्या प्रांगणात जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित होते. त्यावेळी स्पर्धक खेळाडूंच्या पालकांनी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी अनेकांनी त्यांच्या आयोजनाविषयी तोंडभरून कौतुक केले तर काहींनी त्यांना मिळत असलेल्या आदरातिथ्यासाठी अशोक जैन यांचे आभार व्यक्त केले. यासह काहींनी अश्या स्पर्धा कायम तुमच्याकडे आयोजित केल्या जाव्यात असा अट्टाहास केला. यावेळी हिमाचल प्रदेश येथील स्पर्धकाच्या पालकांनी आपल्याला आलेल्या अनुभवाचे कथन करतांना सांगितले कि, हिमाचल येथून जळगावला येताना अनेकांनी चेस साठी जळगावला जात आहात का? तुम्ही इतर कुठला खेळ मुलांसाठी निवडावा. मात्र पालकांचं मुलावर आणि त्याच्या आवडीविषयी असलेलं प्रेम यातून प्रेरणा देण्यासारख आहे आणि त्या पालकांनी हिमाचल मध्ये चेससाठी जैन इरिगेशनने पुढाकार घेऊन तेथेही प्रचार प्रसार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.