आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर ; या तारखांना होणार परीक्षा..
मुंबई : आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या.
येत्या 24 ऑक्टोबरला ‘क’ गट भरती परीक्षा तर 31 ऑक्टोबरला ‘ड’ गट भरती परीक्षा होणार आहे. 9 दिवसांपूर्वी हॉल तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २,७३९ आणि गट ड संवर्गातील ३,४६६ अशा एकूण ६,२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे.
अॅडमिट कार्ड परीक्षेच्या ९ दिवस आधी
डॅशबोर्डवर सर्व परीक्षा केंद्रांची यादी द्यावी, विद्यार्थ्यांची यादी द्यावी, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. परीक्षा रविवारी असल्यामुळे शाळाही उपलब्ध होणार आहेत. परीक्षेच्या ९ दिवस आधी उमेदवारांना हॉलतिकीट मिळणार आहेत.
अफवांवर विश्वास नको
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केली. परीक्षार्थ्यांनी कोणताही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला किंवा असा कोणताही प्रकार आढळला तर तत्काळ एफआयआर दाखल करण्यात यायला हवा, असेही ते म्हणाले.
न्यासा संस्थेबाबत टोपे म्हणाले…
न्यासा संस्था आरोग्य विभागाने नियुक्त केली नव्हती. कोणत्याही भरती परीक्षेच्या प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा अवलंब होतो. त्यासाठी आयटी विभाग एजन्सी निवड करते. त्या पाच एजन्सींपैकी एकाला काम दिले जाते. याबाबतचा निर्णय माहिती तंत्रज्ञान विभाग घेते. आरोग्य विभाग केवळ परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम करते.
का रद्द झाली होती परीक्षा?
क व ड प्रवर्गातील परीक्षा शनिवार २५ सप्टेंबर व रविवार २६ सप्टेंबर असे दोन दिवस राज्यभरात विविध केंद्राहून घेण्यात येणार होती. परीक्षेतील प्रवेशपत्रातील गोंधळ दोन दिवसांपूर्वीच समोर आला होता. राज्यात अनेक विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटांमध्ये चुका, परीक्षा केंद्राचा पत्ता नसणे, चुकीचे फोटो, दूर-दूर जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र अशा गोंधळामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ, संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर अखेर ही परीक्षा स्थगित करण्यात आली.