एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर झाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक; ठरला ‘हा’ निर्णय
एकनाथ शिंदे यांचा बंडखोरीचा गट मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशात भाजपही आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सक्रीय झाल्याचे म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर आज सुनावणी देताना न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने उपसभापती अजय चौधरी, सुनील प्रभू आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाच दिवसांत या नोटीसला उत्तर द्यावे, असे म्हटले आहे.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जूलै रोजी होणार आहे. तसेच आमदारांनी १२ जूलैपर्यंत आपली बाजू मांडावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पण तोपर्यंत शिवसेनेला बंडखोर आमदारांवर कारवाई करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली आहे. या बैठकीनंतर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदारांना बंडखोर म्हणता येणार नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
योग्य वेळी राज्य हितासाठी योग्य निर्णय घेऊ, सध्या आम्ही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहोत. राज्यातील अस्थिर परिस्थितीवर भाजपचं बारीक लक्ष आहे. भाजपकडे प्रस्ताव आल्यास बैठक घेऊन विचार करू. बंडखोर स्वत:ला अजूनही शिवसैनिक मानत आहेत, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
तसेच भाजपच्या बैठकीत सरकार स्थापनेच्या प्रस्तावाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. भविष्यातील घडामोडींच्या संदर्भामध्ये भूमिका ठरवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरही भाजपच्या बैठकीत मंथन झाले आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.