खड्डे बुजविताच, दुसऱ्या दिवशी ‘अमृत योजने’साठी खोदकाम
जळगाव : शहरातील खड्ड्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. आंदोलनाचा हिसका दाखविल्यानंतर खड्डे बुजविले मात्र दुसऱ्याच दिवशी ‘अमृत’ योजनेच्या पाइपसाठी खड्डे खोदण्यात आले. त्यामुळे नागरिकांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. शहरातील शिवाजीनगर, दूध फेडरेशन रोड, सत्यमनगर या भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. त्यानंतर प्रशासन जागे झाले, त्यांनी अधिकारी व मक्तेदाराच्या बैठका घेत रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. मक्तेदारांनाही तातडीने अनेक भागात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. त्यामुळे लोकांना काही अंशी दिलासा मिळाला.
दुसऱ्याच दिवशी खोदकाम
शहरातील खड्डे अमृत योजनेमुळेच झाले असल्याचा आरोप होत आहे. मात्र आता तो सिद्धही होत असल्याचे नागरिकांतर्फेच सांगण्यात आले. दूध फेडरेशन ते रेल्वे स्टेशन रस्त्यावरील खड्डयाबाबत नागरिकांनी आंदोलन केले, जनतेने महापौर जयश्री महाजन यांना घेराव घातला तर नगरसेवक दिलीप पोकळे यांनीही महापालिकेत खड्डे बुजविण्याची मागणी केली त्यानंतर या रस्त्यावरील खड्डे मक्तेदाराने तातडीने बुजविले, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी ‘अमृत’ योजनेच्या मक्तेदाराने खड्डे बुजविलेल्या रस्त्यावर एक लांब खड्डा खोदला व पाणी पुरवठ्याची पाइप लाईन टाकण्याचे काम सुरू केले.
हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत. जर डांबरीकरणानंतर असे खड्डे खोदले तर काय होणार असा प्रश्नही आता जनतेतर्फे विचारण्यात येत आहे.
नगरसेवकाची तक्रार
या भागातील नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे यांनी याबाबत थेट महापालिकेत तक्रार केली आहे. अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्याचे सांगून या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. महापालिकेचे अधिकारी यांनी त्याबाबत पत्रही दिले आहे. डांबकरीकरणाअगोदर या ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले, त्यानंतर या रस्त्यावर ‘अमृत’तर्फे खड्डा कसा खोदण्यात आला, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. जनतेला का त्रास दिला जात आहे. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.