खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक ऐनवेळी थांबविण्याचे गौडबंगाल काय?
शासन व प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे काय?-माजी आ.स्मिता वाघ यांचा सवाल
अमळनेर- (प्रतिनिधी- नूर खान ) येथील खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेच सुरू झाली असताना आणि स्थानिक प्रशासनाच्या नजरेसमोर निवडणूकीस गती आली असताना मतदानाच्या तीन दिवस आधी ही प्रक्रिया थांबविली जाते,प्रशासनाचे हे मोठे गौडबंगाल असून कोविड परिस्थितीत शासनाला शासकीय निवडणुका चालतात मग खाजगी संस्थांच्या का नाही? यावरून शासन आणि प्रशासन दोघांचेही डोके ठिकाणावर आहे काय?असा सवाल माजी आ स्मिता वाघ यांनी जाहीरपणे केला आहे.
खान्देश शिक्षण मंडळ निवडणुकीत नशीब आजमावत असलेले सारे उमेदवार आणि सर्व सभासदांच्या भावनांशी हा खेळ करण्याचाच प्रकार प्रशासनाने केला असून हा प्रकार संशयास्पद आणि निषेधात्मक देखील असल्याचा आरोप स्मिता वाघ यांनी केला आहे.यासंदर्भात आपल्या भावना स्पष्ट करताना स्मिता वाघ यांनी म्हटले आहे की येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणूकीस आधीच विलंब झाला असताना संस्थेच्या अध्यक्षांनी कोविड प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रीतसर जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवडणुकीची परवानगी मगितली होती त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी देखील निवडणुकीस परवानगी दिल्याने अध्यक्षांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला,त्यानुसार 23 जानेवारी 2022 रोजी मतदान तर 24 जानेवारी 2022 रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार होती,यादरम्यान उमेदवारांचे फॉर्म भरणे,छाननी,माघारी आदी प्रक्रिया सुरळीत पार पडून सर्व उमेदवार प्रचाराच्या कार्यात देखील सक्रिय झाले होते,खान्देश शिक्षण मंडळाचे सभासद जिल्हाभरच नव्हे तर राज्यभर आणि राज्याबाहेर देखील विखुरले असल्याने सर्वच उमेदवारांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला,आणि विशेष म्हणजे निवडणुकीची ही धामधूम जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या नजरेसमोर सुरू होती.गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाने पुन्हा तोंड वर काढल्याने शासन आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध आणले आहेत,असे असताना प्रशासनाने त्याचवेळी निवडणूक थांबविण्याचे निर्देश खा. शी. मंडळाच्या अध्यक्षांसह निवडणूक उपसमितीला दिले असते तर उमेदवारांच्या भावनांशी यापद्धतीने खेळ झालाच नसताना मात्र त्यावेळी प्रशासनास तशी गरज वाटली नाही आणि ज्यावेळी मतदानाची तारीख नजीक आली त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षांना निवडणुकीची नव्याने परवानगी घेण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले,यावरून हा हास्यास्पदच प्रकार असल्याचे स्पस्ट दिसत आहे.प्रशासनास आताच असा निर्णय का घेतला याचाही उलगडा झाला पाहिजे.
कोविड रुग्ण संख्या वाढत असली तरी अमळनेर येथे परिस्थिती फारशी कठीण नाही,त्यात जे रुग्ण आढळताय ते घरच्या घरी उपचाराने बरे होत असून घाबरण्याचे काहीच कारण नाही,प्रत्यक्षात याही परिस्थितीत ज्याप्रमाणे इतर निवडणुका निर्बंध लावून पार पडल्या त्यानुसार खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक घेणे शक्यही होते,निवडणूक उपसमिती आणि संस्थेने तशी तयारी देखील केली होती आणि सर्व उमेदवारांनी देखील नियम पाळण्याची लेखी हमी दिली होती,असे असताना प्रशासनाने ऐनवेळी निवडणूक थांबविणे म्हणजे आज संपुर्ण शंकास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे.कोविड चा बाऊ करण्याचाच हा प्रकार आहे.
कोविड परिस्थितीतही निवडणूक घेतली पाहिजे हा आमचा आग्रह मुळीच नसून केवळ जो निवडणूक कार्यक्रम लावला गेला तो शेवटच्या टप्प्यात थांबवला आमचा स्पस्ट विरोध आहे.या प्रकारामुळे सर्वच उमेदवार कमालीचे हादरले आहेत,यासंदर्भात आम्ही राज्याचे विरोधी पक्ष नेते ना. देवेंद्रजी फडणवीस आणि वरिष्ठांशी चर्चा व त्यांचे मार्गदर्शन घेऊन तक्रार करणार आहोत,तरी प्रशासनाने येत्या आठ दिवसात जेथून निवडणूक थांबवली तेथून पुन्हा कार्यान्वित करून मतदानाची व मतमोजणीची तारीख त्वरित जाहीर करत हा सावळा गोंधळ थांबवावा अशी मागणी स्मिता वाघ यांनी केली आहे.