चाळीसगावला ४७ मशिदींनी घेतली भोंग्याची परवानगी
२९ मंदीरांचाही समावेशः मनसेतर्फे सायंकाळी झाली पोलिसांच्या उपस्थितीत हनुमान मंदिरात महाआरती
चाळीसगाव | प्रतिनिधी
शहर, ग्रामीण व मेहुणाबारे पोलिस स्थानकाच्या अंतर्गत येणा-या ४८ पैकी ४७ मशीदींच्या पदाधिका-यांनी भोंग्यांची परवानगी घेतली असून यात २९ मंदिरांचाही समावेश आहे. बुधवारी सायंकाळी पोलिसांच्या परवानगीने वाय पाॕईंट परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरात मनसेच्या पदाधिका-यांनी पोलिसांच्या परवानगीने महाआरती केली. अशी माहिती पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी दिली.
शहरात एकुण १७ पैकी १६ मशीदींच्या पदाधिका-यांनी भोंग्यांची परवानगी घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच या परवानग्या देण्यात आल्या आहे. सात मंदिर पदाधिका-यांनी परवानगी घेतली आहे. मनसेच्या सहा पदाधिका-यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहे.
ग्रामीण पोलिस स्थानकातर्गत येणा-या सर्व १३ मशिदींच्या पदाधिका-यांना नियमाप्रमाणे परवानगी देण्यात आली आहे. २० मंदिर पदाधिका-यांनी देखील परवानगी घेतली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंग यांनी दिली.
मेहुणबारे पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणा-या एकुण १८ मशिदींच्या पदाधिका-यांना न्यायालयाच्या निर्देशानुसार परवानगी दिली आहे. दोन मंदिरांच्या पदाधिका-यांनी रितसर परवानगी घेतल्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विष्णू आव्हाड यांनी सांगितले.
पोलिस बंदोबस्तात मनसेतर्फे महाआरती
बुधवारी धुळे रोड परिसरातील वाय पाॕईंट जवळील पंचमुखी हनुमान मंदिरात मनसे पदाधिका-यांमार्फत सायंकाळी साडे सात वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात पोलिस निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सचिन कापडणीस यांच्यासह पोलिस व होमगार्ड यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. मनसेचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंग शिंदे, शहराध्यक्ष अण्णा विसुपते यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी पंकज स्वार, जितेंद्र देसले, विलास राठोड या प्रमुख पदाधिका-यांसह १० ते १५ मनसेसैनिक, भाविक व मंदिराचे व्यवस्थापक गुलाब चौधरी आदि उपस्थित होते.