DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावमध्ये शिवसेनेला खिंडार; उपजिल्हा संघटकांसह ६० पदाधिकारी शिंदे गटात सहभागी

जळगाव | प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या उपजिल्हा संघटकांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य, अशा साठ पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे जिल्हाप्रमुखांकडे राजीनामे दिले आहेत. दरम्यान, शनिवारीही (१६ जुलै) धरणगाव तालुक्यातील काही पदाधिकार्‍यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटाला समर्थन दिले आहे.

शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा वाद सध्या राज्यात सुरू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला आता चांगलेच धक्के बसत आहेत. रविवारी जळगाव तालुक्यातील शिवसेनेला मोठे खिंडार पडले. शिवसेनेचे माजी जळगाव तालुकाप्रमुख तथा उपजिल्हा संघटक नानाभाऊ सोनवणे (दापोरीकर) यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सभापती व सदस्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करीत ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. उपजिल्हा संघटक नानाभाऊ सोनवणे यांनी रविवारी माजी मंत्री तथा आमदार गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ पदाचा राजीनामा दिला आहे. धरणगाव तालुक्यानंतर आता जळगाव तालुक्यातही शिवसेनेला मोठे धक्के बसत आहेत.

जळगाव शहरासह ग्रामीण मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे.तालुक्यातील तळागाळातील दीनदुबळ्या जनतेला विकासाची आस लागली आहे. माजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा आमदार गुलाबराव पाटील हेच विकास करतील, असा आशावाद राजीनामा देणार्‍या शिवसैनिकांकडून सांगण्यात आले. आम्ही जळगाव शहरासह ग्रामीण विकासाच्या मुद्यावर राजीनामा देत असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. आता आम्ही साठ पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत. अजूनही काही पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार आहेत, असे सांगण्यात आले.

दरम्यान, सध्या भाजप-शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची उत्सुकता असतानाच आमदार गुलाबराव पाटील यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के असल्याचे संकेत मिळाले आहेत. आमदार पाटील यांनी शिंदे गटाची साथ घेतली असून, त्यांचा पहिल्याच टप्प्यात मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

मधल्या काळात जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत कायम राहणार असल्याची ग्वाहीही दिली होती. शनिवारी (१६ जुलै) शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांनी आपापल्या पदांचे राजीनामे देत शिवसेनाला जय महाराष्ट्र केला आहे. पदाधिकार्‍यांच्या राजीनामासत्रामुळे जिल्ह्यातील शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

दरम्यान, जळगावमधील शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर बोलताना, “सध्या राज्यभरात शिवसेनेच्या गावस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातही नवीन पदाधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी व्हॉटसअ‍ॅपद्वारे राजीनामे पाठविले आहेत. जळगाव व धरणगाव तालुक्यांतील पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत, ते जळगावमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात सहभागी नव्हते,” असे शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.