DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

डॉ अनिल शिंदे माझ्या पत्नीच्या मृत्यूस जबाबदार गुन्हा दाखल करा शेतमजुराचे उपोषण

डॉक्टर अनिल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी शेतमजुराचे उपोषण

अमळनेर

 

(प्रतिनिधी:-नूर खान)येथील डॉ.अनिल शिंदे हे माझ्या पत्नीच्या मृत्यूस जबाबदार आहेत. त्यांची चौकशी होऊन त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करावा , या मागणीसाठी चिखलोड, (तालुका- पारोळा) येथील ज्ञानेश्वर राघो पाटील( वय ५४) हे भूमिहीन शेतमजूर २६ रोजी कडाक्याच्या थंडीत उघड्यावर पहाटे सहा वाजेपासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषणास बसले होते. मात्र प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या आश्वासनामुळे त्यांनी तूर्त दुपारी बारा वाजेच्या सुमारास उपोषण सोडून आंदोलन स्थगित केले
याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री ,पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी व पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रार पत्रात म्हटले आहे की, डॉ. अनिल शिंदे हे माझ्या पत्नीच्या मृत्यूस जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ,यासाठी येथील पोलिस ठाण्यात २३ ऑक्टोबर २०२१ रोजी तक्रार दिली होती. मात्र त्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी १२ जानेवारी २०२२ रोजी त्यांच्या तक्रारीचे काय झाले ? अशी येथील पोलीस ठाण्यात लेखी विचारणा केली. त्यावरून येथील पोलीस ठाण्याने पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने वैद्यकीय अहवाल प्राप्तीसाठी वैद्यकीय अधिक्षक, शासकीय वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, जळगाव यांना आम्ही पत्र पाठवले होते. मात्र त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही .त्यामुळे आम्ही १२ जानेवारी २०२२ रोजी पुन्हा त्यांना स्मरण पत्र दिले आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्याशिवाय आम्हास कारवाई करता येणार नाही असे लेखी उत्तर दिले .
दरम्यान याबाबत पाटील यांनी १७ रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचीही समक्ष भेट घेतली. िल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणी योग्य त्या कारवाईचे त्यांना आश्वासन दिले होते. पाटील यांनी १७ रोजीच वैद्यकीय अधीक्षक तथा शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते भेटू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना भेटून निवेदने दिली. तरीही त्यावर काहीही कारवाई झाली नाही. १९ जानेवारी रोजी पाटील यांनी पुनश्च जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलिस अधीक्षक ,प्रांत अधिकारी कार्यालय व येथील पोलीस ठाण्यात २६ जानेवारी पासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणास बसणे बाबत इशारावजा निवेदन दिले. मात्र तरीही याबाबत काहीएक कारवाई झाली नाही. परिणामी पाटील २६ रोजी आमरण उपोषणास बसले होते.
याबाबत पाटील यांनी त्यांची समजूत काढावयास आलेल्या प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना सांगितले की, जिल्हाधिकारी व पोलीस विभागाबाबत माझी काही तक्रार नाही. मात्र वैद्यकीय अधीक्षक , शासकीय वैद्यकीय अधिकारी व त्याचे कार्यालय करीत असलेला हलगर्जीपणा अक्षम्य आहे. ते सुमारे तीन महिन्यांपासून अहवाल देत नाहीत .त्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करता येत नाही .• मी केवळ तीनशे रुपये रोजाने शेतमजुरी करतो. मला वारंवार अमळनेर व जळगावला जाणे- येणे परवडत नाही. तरीही मी उधार – उसनवाऱ्या करून सारख्या चकरा मारतो आहे. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी माझी पत्नी उपचार घेतांना वारल्यामुळे माझ्या घरात स्वयंपाक करायलाही कोणी नाही. मला व माझ्या मुलाला स्वयंपाक येत नाही. आमची खूप दैनावस्था झाली आहे. पत्नीच्या वैद्यकीय खर्चात लाखो रुपयांचे कर्ज झाले आहे. तरीही डॉक्टर अनिल शिंदेंच्या हलगर्जीपणा मुळे तिचा जीव गेला. डॉ. शिंदे यांनी उपचारादरम्यान आमच्याशी वेळोवेळी माणुसकीहीन व अत्यंत शिवराळ भाषा केली. शिवीगाळ व उर्मटपणे वागणूक दिली आहे. या सर्व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नाईलाजास्तव मला आर्थिक दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्याही सोसवत नसले तरीही मी उपोषणात बसलो आहे.

ज्ञानेश्वर पाटील यांच्या पत्नीचा मृत्यू संदर्भात वैद्यकीय अहवाल देणेबाबत मी स्वतः अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्याशी बोलले आहे. ते लवकरच अहवालाची पूर्तता करणार आहेत.

सीमा अहिरे प्रांताधिकारी

अधिष्ठाता साहेबांकडून अहवाल आल्यानंतर डॉ. अनिल शिंदे दोषी असतील तर निश्‍चितपणे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल .मात्र अहवाल आल्याशिवाय आम्हास कोणतीही कारवाई करता येणार नाही .

जयपाल हिरे
पोलीस निरीक्षक

रुग्ण महिलेला अनेक आजार होते. तीचा मृत्यू झाल्यानंतर ही मंडळी दोन महिन्यानंतर जागी झाली त्याला मी काय करू शकतो ? मी सर्व कागदपत्रे पोलीस ठाण्यात दिले आहेत. रुग्णाच्या कुटुंबीयांनी ग्राहक पंचायतही जावे. कोणती डॉक्टर रुग्णाला मारून टाकत नाही. अर्धवट ज्ञानामुळे ते असे कृत्य करीत आहेत. उपोषणाला बसणे त्यांचा अधिकार आहे.

डॉ.अनिल शिंदे

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.