DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

नोकरीचे आमिष दाखवत ‘बंटी-बबली’ने लाटले साडेतीन लाख

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील देवेंद्रनगरातील गृहस्थाला मध्य प्रदेशातील छिंदवाडा वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीला लावून देतो, असे सांगत एका दांपत्याने चक्क साडेतीन लाखांत फसवणूक केली आहे. मोबाईलवर बनावट नियुक्तिपत्राची प्रत टाकून हे दांपत्य अतिरिक्त दीड लाख रुपये उकळण्याच्या प्रयत्नात असताना, फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील वैद्यकीय महाविद्यालयात तुम्हाला क्लार्क म्हणून कायम नोकरीला लावून देतो, असे आमिष देत उमेश राजेंद्रप्रसाद चौरसिया (वय ३७, रा. देवेंद्रनगर, जळगाव) यांची ३ लाख ५० हजार रुपयांत फसवणूक करण्यात आली. मध्य प्रदेशातील शिवशंकर लखन जवरकर, नितू जवरकर (रा. दोन्ही चांदामोटा, वॉर्ड १०, क्रांती चौक, छिंदवाडा) अशी फसवणूक करणाऱ्या दांपत्याची नावे आहेत. जळगावात येऊन या दांपत्याने उमेश चौरसिया यांच्याकडून साडेतीन लाख रुपये रोख घेऊन नोकरीची खात्री दिली. थोड्या दिवसांनी चौरसिया यांच्या मोबाईलवर बनावट नियुक्तिपत्र पाठवून संबंधितांनी आणखी दीड लाखांची मागणी केली. मात्र, चौरसिया यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केल्यावर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. चौरसिया यांच्या तक्रारीवरून शिवशंकर व नितू जवरकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.