परिवार गाढ झोपेत असताना तरुणाने घेतला गळफास
पाचोरा : प्रतिनिधी
नगरपालिकेत कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाने आज १४ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरात उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पाचोरा नगरपालिकेत कंत्राटी पदावर कार्यरत असलेले अनिल बागुल (वय – २५) रा. जवाहर हौसिंग सोसायटी या होतकरु तरूणाने आज रविवारी १४ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. सदरचा प्रकार बाजुच्या खोलीत असलेल्या त्यांच्या परिवाराच्या लक्षात येताच परिवारातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला. घटना उघडकीस आली.
परिवाराच्या सदस्यांनी अनिल बागुल यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी अनिल बागुल यांना मृत घोषित केले. घटनेबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अनिल बागुल यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार अनिल बागुल यांनी आत्महत्या का केली ? या मागील कारण अद्याप समजू शकले नाही.