DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

म्हसरूळ भागात पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण

हेल्मेटविना पेट्रोल देण्यास नकार दिल्याने चार जणांच्या टोळक्याने केला हल्ला

नाशिक :

शहरात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेला काही घटकांकडून आव्हान देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. हेल्मेटविना पेट्रोल देण्यास नकार दिल्याने चार जणांच्या टोळक्याने म्हसरूळ भागात पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण केली. खुटवडनगर येथील पंपावर हेल्मेटविना आलेल्या वाहनधारकाने पोलिसांशीही हुज्जत घातली. म्हसरूळच्या घटनेप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. तर खुटवडनगर येथे हुज्जत घालणाऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. या घटनाक्रमाने पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मागील पाच वर्षांत शहरात अपघातात ८२५ जणांचा मृत्यू झाला. त्यातील ४६७ हे दुचाकीस्वार असून त्यातील ३९७ जणांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. अशा अपघातांतील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांनी स्वातंत्र्य दिनापासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम सुरू केली. तिची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक पंपावर पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले. तथापि, प्रारंभीचे एक-दोन दिवस काही पंपावर पोलीस नसल्याने वाहनधारक पंपावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याचे काही प्रकार घडले होते. असे वाद आता वेगळ्या वळणावर जात असल्याचे बुधवारच्या घटनेतून समोर आले.

दिंडोरी रस्त्यावरील इच्छामणी पेट्रोल पंपावर सायंकाळी साडेसहा वाजता दोन दुचाकींवर चार जण इंधन भरण्यासाठी आले. त्यातील एका दुचाकीधारकाकडे हेल्मेट नसल्याने कर्मचारी ज्ञानेश्वर गायकवाड याने इंधन देण्यास नकार दिला. संबंधिताने साथीदाराकडून तात्पुरते हेल्मेट घेऊन इंधन भरण्याचा प्रयत्न केला. त्यास कर्मचाऱ्याने आक्षेप घेतल्याने संशयितांनी ज्ञानेश्वरला पंपाच्या आवाराबाहेर नेले. शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी मिलिंद कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासचक्रे फिरवली. अवघ्या काही तासात मंगेश पगार (स्नेहनगर), मयूर देवरे आणि अक्षय जाधव (आरटीओ कॉर्नर) या संशयितांची धरपकड केली. त्यांचा साथीदार युवराज शिरोडकर (बदलापूर) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पंपावर नियुक्त पोलीस कर्मचारी काही कामासाठी बाहेर गेले असताना ही घटना घडल्याचे पंपावरील कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले.

गुरुवारी सकाळी खुटवडनगर येथील पंपावर याच कारणावरून गोंधळ झाला. हेल्मेट नसल्याने पेट्रोल देण्यास नकार दिल्यावर वाहनधारकाने वाद घातला. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्याने समजावण्याचा प्रयत्न केला असता वाहनधारकाने त्यांच्याशीही हुज्जत घातली. त्यामुळे या वाहनधारकास ताब्यात घेऊन अंबड पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेल्मेट नसणाऱ्यांना पेट्रोल देण्यास नकार दिल्यास वाहनधारक मारहाण करू लागल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मारहाणीच्या घटनेनंतर म्हसरूळच्या पंपावरील कर्मचाऱ्यांनी काम बंद केले होते. पंप आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी पंपधारकाकडून केली जात आहे.

हेल्मेट वापरकर्ते वाढल्याचा दावा

म्हसरूळ परिसरात ज्या पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना मारहाण झाली, तिथे गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांनी भेट देऊन पंपचालक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सुरक्षेची ग्वाही दिली. पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. बदलापूर येथील त्यांचा साथीदार लवकर जेरबंद होईल, असे पाण्डय़े यांनी सांगितले. नियमांचे पालन न करणाऱ्यांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल. नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहीम सुरू होण्याआधी शहरात १० टक्के वाहनधारक हेल्मेट परिधान करीत होते. ही मोहीम सुरू झाल्यानंतर ते प्रमाण ५० ते ६० टक्क्यांवर गेले आहे. हेल्मेटची सवय लागण्यास काही वेळ लागेल, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नमूद केले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.