देशातील पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रातील पत्रकारितेचे वेगळे महत्व – जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीची बैठक
महाराष्ट्रातील पत्रकारिता मूल्य जपणारी – डॉ. महेश्वर रेड्डी
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीची बैठक
जळगाव,प्रतिनिधी देशातील पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रातील पत्रकारितेचे वेगळे महत्व आहे. येथील पत्रकारिता आजही मूल्यांची जपणूक करताना दिसते, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीची बैठक जळगाव येथे सुरू आहे. यावेळी समिती सदस्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. राज्य समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक सर्वश्री डॉ. गणेश मुळे, किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे यांच्यासह समितीचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. रेड्डी म्हणाले की, महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. राज्याची ही प्रतिमा तयार करण्यात येथील प्रसार माध्यमांचे मोठे योगदान आहे. नैतिक मूल्ये जपत पत्रकारिता राज्यात होते ही अभिमान आणि समाधानाची बाब आहे. त्यामुळेच, राज्यात काम करण्यातांना चांगला अनुभव घेता येतो असे त्यांनी नमूद केले.
यावेळी अध्यक्ष श्री. जोशी यांनी स्वागतपर प्रास्ताविकात राज्य अधिस्वीकृती समितीच्या कामकाजाविषयी माहिती दिली. राज्य समितीद्वारे राज्यातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मंजूर केली जाते. या अधिस्वीकृती पत्रिकेच्या माध्यमातून पत्रकारांना राज्य शासनातर्फे विविध लाभ दिले जातात, अशी माहिती त्यांनी दिली.यावेळी समिती सदस्य महेश तिवारी यांनी विचार व्यक्त केले.