राज्यात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा धोका
मुंबई : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या कहरातून लोक अद्याप सावरू शकलेले नाहीत. पाऊस आणि पुरामुळे त्रस्त झालेल्या रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.
हवामान खात्याने ३० जुलैपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तविली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह काही जिल्ह्यात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला जात होता. परंतु परिस्थिती अतिवृष्टीच्या पलीकडे गेली होती आणि पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले. येत्या ४८ तासांत या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे.
२७ जुलै आणि २८ जुलैला पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २९ आणि ३० जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा अंदाज वर्तवताना हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे ऑरेंज अॅलर्ट जारी केला असून पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे.