आरटीईसाठी ९ हजार पालकांनी भरले अर्ज, अर्ज करण्यासाठी ४ जून पर्यंत मुदतवाढ
जळगाव : उच्च न्यायालयाने आरटीईत जि.प.शाळा वगळून पूर्वीप्रमाणेच प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढून नव्याने अर्ज प्रक्रिया राबविली होती. या नव्याने राबविण्यात आलेल्या अर्ज प्रक्रियेला पालकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आरटीई अंतर्गत ९ हजार २२८ पालकांनी अर्ज भरले आहेत. त्यातच पालकांना अर्ज भरण्यासाठी अजून ४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यात २८३ शाळांनी आरटीईत सहभाग नोंदविला आहे या अंतर्गत ३०३३ जागा आहेत. जिल्ह्यातील खासगी शाळेत आरटीई अंतर्गत २५ टक्के पाल्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी पालकांना अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर आरटीईच्या शाळाच्या नियमानुसार व लॉटरी सोडत काढून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. आरटीईत यंदा पहिल्यांदाचा शासनाने जिल्हा परिषद शाळा एक किमीच्या आत असल्यास इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी विद्यार्थ्यास शाळा ऑनलाईन अर्ज भरतांना दाखवतच नव्हती. त्यामुळे पालकांनी आरटीईकडे पाठ फिरवली होती. शासन जाहिर केलेल्या नवा निर्णय रद्द होऊन पूर्वीप्रमाणेच आरटीईची प्रक्रिया राबविण्यात यावी, यासाठी पालकांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. त्याबाबत न्यायालयाने निर्णय देत पूर्वीप्रमाणेच आरटीईची प्रक्रिया राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते. मागील वर्षी पालकांनी आरटीईसाठी ९ हजार अर्ज भरले होते. ४ जूनची मुदतवाढ मिळाल्याने यंदा मात्र १० हजाराहून अधिक अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरटीई अंतर्गत अर्ज भरण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेला ४ जूनपर्यंत शिक्षण संचालकांकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालकांनी यासंदर्भात पत्रक काढून सूचित केले आहे. पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी अर्ज भरण्या करीता वाढीव मुदत मिळाली आहे.
– विकास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. जळगाव