जळगावात डंपरचा कहर; कालिंका माता चौकात वृद्धाचा जागीच मृत्यू
जळगाव : शहरातील कालिंका माता चौक परिसरात शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरच्या धडकेत एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७, रा. जुने जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त नागरिकांनी डंपरची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील हे बाजारातून भाजीपाला घेऊन घरी परतत असताना कालिंका माता चौकातून जाणाऱ्या वेगात असलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, डंपरचे चाक त्यांच्या चेहऱ्यावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी चालक मोबाईलवर बोलत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. याच चौकात गेल्या वर्षी एका लहान मुलाचा डंपरखाली मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करत त्याच्या काचा फोडल्या. वाढता तणाव लक्षात घेऊन दंगा नियंत्रण पथक आणि शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, कालिंका माता चौक अपघातप्रवण ठरत असल्याने येथे तातडीने आधुनिक सिग्नल यंत्रणा सुरू करावी, तसेच चौकात २४ तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह ललित नारखेडे यांनी केली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.