रेल्वे आणि महामार्ग विकासाची मोठी झेप; महाराष्ट्रात नवे बोगदे-मार्ग उभारणार
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रासह तीन राज्यांतील महत्त्वाच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयांमुळे देशातील वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे.
महाराष्ट्रात कसारा ते मनमाड दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पात एकूण पाच बोगदे बांधले जाणार असून त्यापैकी एक बोगदा सुमारे २४ किलोमीटर लांबीचा असेल. तसेच २३७ पूल आणि पाच रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षित हालचालीसाठी २१ अंडरपासही तयार केले जातील. या मार्गिकेमुळे रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढून दरवर्षी सुमारे ४६.१ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक शक्य होणार आहे.

या बैठकीत दिल्ली-अंबाला आणि बल्लारी-होस्पेट या नव्या रेल्वे मार्गिकांनाही मान्यता देण्यात आली. या सर्व प्रकल्पांमुळे देशाच्या रेल्वे जाळ्यात सुमारे ३८९ किलोमीटरची भर पडेल आणि लाखो नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. ‘पीएम-गतिशक्ती राष्ट्रीय आराखड्या’अंतर्गत हे प्रकल्प राबवले जाणार असून, प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल.
रस्ते विकासालाही मोठी चालना मिळाली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग १६० ‘अ’ अंतर्गत घोटी-त्र्यंबक (मोखाडा)-जव्हार-मनोर-पालघर मार्गाच्या उन्नतीकरणासाठी ३,३२०.३८ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. हा मार्ग मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
याशिवाय गुजरातमधील दोन महामार्ग प्रकल्पांसाठी ४,५८३.६४ कोटी रुपये आणि तेलंगणातील राष्ट्रीय महामार्ग १६७ च्या रुंदीकरणासाठी ३,१७५.०८ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
दरम्यान, आसाममध्ये गोहपूर ते नुमालीगड दरम्यान ब्रह्मपुत्र नदीखाली देशातील पहिला रस्ते-रेल्वेसाठीचा पाण्याखालील दुहेरी बोगदा बांधण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे ३४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी अंदाजे १८,६६२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे ईशान्य भारतातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.