देशात पुन्हा पावसाची शक्यता; IMD चा ११ राज्यांना अलर्ट
देशातील अनेक भागांमध्ये हिवाळा संपण्याच्या मार्गावर असतानाच हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांनंतर उत्तर भारतासह देशातील ११ राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या बदलामुळे काही भागांमध्ये तापमानात घट होऊ शकते. हवामानातील या चढ-उतारांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डोंगराळ भागांसाठीही हवामान विभागाने स्वतंत्र सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भागांमध्ये पुढील तीन दिवसांत तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील हवामानाचा अंदाज
महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात जाणवणारा गारवा आता कमी होत असून तापमानात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. आज राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात प्रामुख्याने स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित वातावरण राहील. दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही भागांमध्ये उष्ण व दमट हवामान जाणवू शकते.

आठवडाभर उत्तर कोकण, दक्षिण कोकण, गोवा, उत्तर व दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच गुजरात प्रदेश आणि सौराष्ट्र-कच्छ भागात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.
या राज्यांमध्ये पावसाचा इशारा
हवामान विभागाने पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूह या राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.