बनावट वैद्यकीय कागदपत्रांद्वारे विमा क्लेम; डॉक्टर व लॅब व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा
जळगाव – विमाधारकाच्या संमतीशिवाय त्याला रुग्णालयात दाखल दाखवून बनावट वैद्यकीय अहवालांच्या आधारे विमा कंपनीकडून क्लेम मिळवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगावातील टायटन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबच्या व्यवस्थापकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विजय संतराम गुप्ता (वय २५, रा. तुघलकाबाद, नवी दिल्ली) यांच्याकडे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची वैद्यकीय विमा पॉलिसी आहे. २१ सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी प्रत्यक्षात उपस्थित नसताना त्यांच्या नावाने टायटन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल दाखविण्यात आल्याचा आरोप आहे.

तसेच जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबमध्ये त्यांच्या नावाने बनावट वैद्यकीय तपासणी अहवाल तयार करण्यात आले. या कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडे क्लेम सादर करून रक्कम मंजूर करून घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर विजय गुप्ता यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री उशिरा डॉ. इम्रान बी. नाईकवाडी (टायटन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल) आणि जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून फौजदार चंद्रकांत धनके पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.