DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्लास्टिक बंदीसाठी महापालिकेचा पुढाकार; विक्रेत्यांसोबत समन्वय बैठक

जळगाव – शहरात एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय व आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर महापौर सौ. दिपमाला काळे यांनी पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक विक्रेते आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी प्रभावीपणे कशी अंमलात आणावी, यावर चर्चा होणार आहे.

महापौरांनी महानगरपालिका प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, एकेरी प्लास्टिक मोकाट जनावरांनी खाल्ल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तसेच नाले आणि गटारांमध्ये प्लास्टिक साचल्याने पाण्याचा निचरा अडतो आणि पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो.

प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे ते जमिनीत दीर्घकाळ साचून राहते आणि जमिनीची सुपीकता कमी होते. त्यामुळे पर्यावरणाला दीर्घकालीन हानी पोहोचत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली आहे. शासनाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी शहरात त्याचा वापर सुरू असल्याचे दिसून येत असल्याची नोंद पत्रात करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर प्लास्टिक विक्रेते असोसिएशन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील महापौर दालनात बैठक होणार आहे.

या बैठकीस प्लास्टिक विक्रेते असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहतील. तसेच महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक माहिती आणि अहवालासह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सिंगल यूज प्लास्टिकवर प्रभावी नियंत्रण आवश्यक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता असून शहरातील प्लास्टिकविरोधी मोहिमेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.