DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महापौरांच्या पत्रानुसार कार्यवाही : जळगाव शहरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेचा बडगा

५ हातगाड्या जप्त, अनधिकृत भाडेतत्त्वावरील हातगाड्यांनाही इशारा

जळगाव : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्तता करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता आक्रमक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत कालिका माता मंदिर परिसरातील ५ हातगाड्या जप्त केल्या आहेत.

शहरातील वाढत्या अतिक्रमणाबाबत महासभेमध्ये नुकताच ठराव मंजूर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, महापौर दीपमाला काळे यांनी अतिक्रमण विभागाला लेखी पत्र देऊन कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी दि. २५ अतिक्रमण विभागाने कालिका माता मंदिर परिसरात मोहीम राबवून रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या पाच हातगाड्या उचलून महानगरपालिकेच्या प्रांगणात जमा केल्या आहेत.

या मोहिमेदरम्यान सोमवार, २३ तारखेला इच्छादेवी चौक ते डी-मार्ट दरम्यान सुमारे ४५ ते ६० हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. तपासणीत असे आढळले की, एका खाजगी व्यक्तीने या सर्व गाड्या अनधिकृतपणे लावल्या होत्या आणि तो त्या इतर विक्रेत्यांना भाड्याने देत असे.वअतिक्रमण विभागाने संबंधित व्यक्तीला कडक शब्दांत ताकीद दिली आहे. “यापुढे या परिसरात हातगाड्या दिसल्यास त्या थेट जप्त केल्या जातील,” असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.लवकरच संपूर्ण शहरात रहदारीला अडथळा ठरणाऱ्या हॉकर्सविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापौर दीपमाला काळे यांनी दिली.

“शहरात कोणीही अनधिकृत अतिक्रमण करू नये. विक्रेत्यांनी नियमानुसार आणि ठरवून दिलेल्या जागेतच आपल्या हातगाड्या लावाव्यात, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.”
— दीपमाला काळे, महापौर

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.