DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात दुचाकी चोरीचा पर्दाफाश; ३ लाख १० हजार रुपयांच्या १० मोटारसायकली जप्त

जळगाव : शहरात घडलेल्या मोटारसायकल चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणात नशिराबाद येथील एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे ३ लाख १० हजार रुपये किंमतीच्या १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपासासाठी आरोपीला शनिपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश ज्ञानेश्वर चौधरी यांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भानू हॉटेल परिसरातून त्यांची हिरो स्प्लेंडर (एमएच १९ बीवाय ७४१३) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने माहितीच्या आधारे समीर शेख शफीक शेख (वय २०, रा. नशिराबाद) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने जळगाव शहरासह एमआयडीसी, जिल्हापेठ तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथूनही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून विविध कंपन्यांच्या एकूण १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे अनेक चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून पुढील तपास शनिपेठ पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.