DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

उन्हाळी सुट्ट्यांत प्रवास सोपा; मध्य रेल्वे चालवणार १७६ स्पेशल ट्रेन

मुंबई: उन्हाळ्यातील मोठी मागणी लक्षात घेता प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने १७६ विशेष फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह (सीएसएमटी) लोकमान्य टिळक टर्मिनसवरून (एलटीटी) विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१०७९/८० सीएसएमटी ते गोरखपूर (४४ फेऱ्या), (०११४३/४) एलटीटी ते दानापूर (४४ फेऱ्या), (०१४१५/६) पुणे-गोरखपूर (४४ फेऱ्या), (०१४४९/५०) पुणे-दानापूर (४४ फेऱ्या) अशा मार्गावर विशेष रेल्वे धावणार आहे. विशेष गाड्यांच्या सविस्तर माहितीसाठी आयआरसीटीसी आणि मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

कुठे असतील थांबे?
सीएसएमटी ते गोरखपूर ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबादला थांबे असतील. दरम्यान, एलटीटी ते दानापूर ट्रेनला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

आज रात्री पीआरएस बंद
मुंबईतील प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये (पीआरएस) डिस्क डीफ्रॅगमेंटेशन आणि प्रणाली पॅरामीटर ट्युनिंग अशी तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. यासाठी गुरुवारी १२ मार्चला रात्री ११.४५ ते दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ३.१५पर्यंत या साडेतीन तासांसाठी पीआरएस सुविधा बंद राहणार आहे. पीआरएस बंद असल्याने रेल्वेच्या चार्टसंबंधी कामकाज, गाडी क्रमांक अद्यावत करणे, आयव्हीआरएस सुविधा, चालू आरक्षण, चार्ट प्रदर्शन, काउंटरवरील परतावा या सुविधा बंद राहणार आहेत. मात्र, विद्यमान परतावा नियमांनुसार टीडीआर जारी करण्यात येईल. मुंबई अंतर्गत येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे इंटरनेटद्वारे तिकीट आरक्षण उपलब्ध राहणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.