गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘चैत्र पालवी स्वरोत्सव’
महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन सुगम संगीत मैफल
जळगाव : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अत्यंत मंगल दिवस असून याच दिवशी नव्या मराठी वर्षाची सुरुवात होते. या मंगल दिनाचे स्वागत करण्यासाठी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रात:कालीन सुगम संगीताच्या मैफिलींचा ‘चैत्र पालवी स्वरोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, दि. १९ मार्च रोजी सकाळी ठीक ६ वाजता महात्मा गांधी उद्यान येथे आयोजित करण्यात आला असून या उपक्रमास भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमाला आमदार राजुमामा भोळे, शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर सौ. दिपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या स्वरोत्सवात सौ. श्रुती जोशी, श्री. वरुण नेवे आणि कु. राजेश्वरी रत्नपारखी (बासरी) हे आपली कला सादर करणार आहेत. त्यांना श्री. राजेंद्र माने संवादीवर तर श्री. राहुल कासार तबल्यावर साथ देणार आहेत. या प्रात:कालीन मैफिलीचे निवेदन सौ. प्रिती झारे करणार आहेत.
गुढीपाडव्याच्या शुभप्रसंगी आयोजित या सुगम संगीत मैफिलीचे सर्व मराठी रसिकांना सुरेल आमंत्रण देण्यात आले आहे. शहरातील कलावंतांच्या सादरीकरणातून गुढीपाडव्याचा उत्सव अधिक मंगलमय होणार असून या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन चांदोरकर प्रतिष्ठान आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.