DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात लवकरच भव्य आर्ट गॅलरी व कला संकुल उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : शहरात मोठ्या शहरांच्या धर्तीवर भव्य आर्ट गॅलरी आणि कला संकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. बालचित्रकार अभिराज निकम यांच्या ‘यथार्थ’ या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की, अभिराज हा केवळ चित्रांमध्ये रंग भरत नाही, तर आपल्या कलेतून भावना आणि वास्तवाला जिवंत रूप देतो. अशा गुणी कलाकारांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी आहे. अभिराज भविष्यात राज्याबरोबरच देशभरात जळगावचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अभिराजच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देताना त्यांनी त्याच्या आई-वडिलांचे तसेच गुरु चित्रकार सचिन मुसळे यांचेही अभिनंदन केले. शासन आणि स्वतः आपण अशा कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी नमूद केले. अभिराजच्या कलेने प्रभावित झालेल्या पालकमंत्र्यांनी त्याला वैयक्तिक पातळीवरही सहकार्य करण्याचा शब्द दिला. यावेळी अभिराजने आपल्या कुंचल्यातून साकारलेले पालकमंत्र्यांचे चित्र भेट देत कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी जळगाव शहरात स्वतंत्र कला संकुलाची आवश्यकता व्यक्त केली. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री पाटील यांनी महापालिकेच्या सहकार्याने शहरात कला संकुल उभारण्याची घोषणा केली. उपमहापौर मनोज चौधरी व नगरसेवक विष्णू भंगाळे यांनीही महापालिकेकडून आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

अभिराज निकम हा इयत्ता आठवीचा विद्यार्थी असून तो चित्रकार सचिन मुसळे यांच्याकडे चित्रकलेचे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या विविध चित्रांना कला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन मुसळे यांनी केले, तर सूत्रसंचालन अक्षय नेहे यांनी केले. आभार प्रदर्शन अभिराज निकम यांनी केले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर मनोज चौधरी, महिला आघाडी संपर्कप्रमुख सरिता कोल्हे-माळी, नगरसेवक गणेश सोनवणे, हर्षल मावळे, ॲड. दिलीप पोकळे, अक्षय नेहे, अभिराजचे वडील मनोज निकम व आई शीतल निकम यांच्यासह कला रसिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.