DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सुरांची सम्राज्ञी आशा भोसले काळाच्या पडद्याआड; वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबई : भारतीय संगीतविश्वातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या सुरेल आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण संगीत आणि मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. छातीत संसर्ग आणि अत्यंत थकवा जाणवल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला होता. त्यांनी हिंदीसह मराठी आणि इतर अनेक भाषांमध्ये हजारो गाण्यांना आपला आवाज दिला. त्यांच्या जवळपास आठ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी २० पेक्षा अधिक भाषांमध्ये सुमारे १२ हजारांहून अधिक गाणी गायली असून त्या बॉलिवूडमधील सर्वात बहुगुणी पार्श्वगायिकांपैकी एक मानल्या जातात.

संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रासाठी त्यांचे योगदान अमूल्य मानले जाते. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. आशा भोसले यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून त्या कायम रसिकांच्या मनात जिवंत राहतील, अशा भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.