DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

मुख्य रस्त्यांवर 'व्हाईट पट्ट्यां'सह पिवळ्या पट्ट्यांच्या कामाला सुरुवात

जळगाव : जळगाव शहराला शिस्तबद्ध आणि सुंदर स्वरूप देण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला आता यश येताना दिसत आहे. महापौर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे शहरात रस्ते विभाजक आणि मार्गांवर पांढरे व पिवळे पट्टे (झेंब्रा क्रॉसिंग व लेन मार्किंग) टाकण्याच्या कामाला रविवार, १२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेपासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

शिवतीर्थ ते आकाशवाणी चौक काम सुरू
रविवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या या कामात पहिल्या टप्प्यात शिवतीर्थ चौक ते आकाशवाणी चौक या मुख्य मार्गावर पांढरे पट्टे टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी वाहतूक कमी असताना हे काम करण्यात आल्याने कामाचा वेग वाढला असून, सोमवारी सकाळी या मार्गाचे रूप पालटल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी रात्री प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. संबंधित कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कामाविषयी सूचना केल्या.

वाहतुकीला लागणार शिस्त
शहरातील वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, रस्ते मार्किंग असणे अत्यंत आवश्यक होते. गेल्या महिनाभरापासून महापौर दीपमाला काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. रस्त्यांवर पट्टे टाकल्यामुळे वाहनधारकांना आपल्या लेनचा अंदाज येईल, ज्यामुळे वाहतुकीला शिस्त लागेल आणि रस्ते अधिक सुरक्षित व सुंदर दिसण्यास मदत होणार आहे.

जनमानसातून कौतुक
शहराच्या सुशोभीकरणासाठी आणि नागरी सुविधेसाठी महापौरांनी घेतलेल्या या निर्णयाचे जळगावकरांकडून स्वागत होत आहे. प्रशासकीय कामांचा पाठपुरावा करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घेतल्याबद्दल महापौरांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.