DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मुक्ताईनगर विश्रामगृह परिसरात बिबट्याचा शिरकाव

 दोन तासांच्या थरारक मोहिमेनंतर वनविभागाकडून पकड

मुक्ताईनगर  : मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात आज सकाळी अचानक बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विश्रामगृहाच्या पाठीमागील बाजूस एका कोपऱ्यात बसलेल्या बिबट्याचे दर्शन आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी व संतोष पाटील यांना खिडकीतून झाले. त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली तसेच ही बाब आमदार चंद्रकांत पाटील यांच्याही निदर्शनास आणून दिली.

घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत तहसीलदार गिरीश वखारे, वनविभागाच्या आरएफओ कृपाली शिंदे व परिमल साळुंखे, पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी सतीश पुदाके यांच्यासह वनविभाग व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले. विश्रामगृह व बस स्थानक परिसर पूर्णतः सील करून नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आले.

दरम्यान, जळगाव येथून बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी आवश्यक इंजेक्शन व गन मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई यांनी आणली. त्यानंतर डोलारखेडा येथील वनपाल गणेश गवळी यांनी अत्यंत कौशल्याने बिबट्याच्या मागील मांडीवर डार्ट मारला. मात्र पहिल्या डोसनंतरही बिबट्या पूर्णतः बेशुद्ध झाला नाही. उलट तो चवताळून विश्रामगृहाची भिंत ओलांडत बस स्थानक परिसरात शिरला व तेथे पडू लागला.

या दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील स्वतः वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत पुढे सरसावले होते. दोन वेळा बिबट्याने त्यांच्या दिशेने झेप घेतली, मात्र सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. अखेर दुसरा डोस देण्यात आल्यानंतर बिबट्याची हालचाल मंदावली आणि वनविभागाच्या पथकाने त्याला सुरक्षितरित्या पकडून पिंजऱ्यात बंद केले.

सुमारे दोन तास चाललेल्या या थरारक बचाव मोहिमेनंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी रेस्क्यू टीमचे कौतुक करून त्यांना बक्षीस दिले. या पथकात शूटर गणेश गवळी, विवेक देसाई तसेच अक्षय मोरे, नवल जाधव, दीपश्री जाधव व दिपाली बेलदार यांचा सहभाग होता.

यानंतर बिबट्याला वनविभागाच्या ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आवश्यक उपचार करून वरिष्ठांच्या परवानगीने त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती आरएफओ कृपाली शिंदे यांनी दिली. या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.