जिल्हा रुग्णालय परिसरातून रिक्षा चोरणारा गजाआड
जळगाव – शहरात वाहन चोरीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. याच दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांनी एका रिक्षा चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील रिक्षा चोरीचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी चोरीची रिक्षा आणि स्पेअर पार्ट्स जप्त केले आहेत. कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (वय 32, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, मूळ रा. शिरपूर, जि. धुळे) असे अटक केलेल्या संशयित चोराचे नाव आहे.
जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून पहाटे 3 वाजेच्या सुमारास एक रिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी 13 एप्रिल रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली की, चोरी करणारा इसम स्वतः एक व्यावसायिक रिक्षाचालक आहे. तो शहरातील विविध भागांतून रिक्षा चोरून त्यांचे स्पेअर पार्ट्स काढणे किंवा कमी किमतीत विक्री करून आर्थिक लाभ मिळवत असे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कल्पेश इंगळे याला एम.एस.ई.बी. ऑफिस (पांडे डेअरी चौक) जवळ रिक्षासह ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडून MH19 BJ 0254 क्रमांकाची रिक्षा आणि तिचे सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) जप्त केले आहेत. या मुद्देमालाची अंदाजे किंमत 75 हजार रुपये आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलेश पवार आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, आरोपीने शहरात आणखी कुठे चोरी केली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.