DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पुढील ४ दिवस राज्यात वादळी पावसाचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई – राज्यात सध्या उन्हाळा आणि पावसाचा अनोखा खेळ सुरू असून विविध भागांत हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. एका बाजूला विदर्भात कडाक्याचे ऊन पडत असताना दुसरीकडे खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळत आहेत.
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांनी २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, २० ते २४ एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या विभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट ऐकू आला किंवा विजा चमकताना दिसल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या जागेत, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. तसेच उघड्यावर मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. सुरक्षित निवारा उपलब्ध नसल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रशासनालाही आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागांनी जनजागृती मोहीम राबवावी, तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत. शाळा व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांना विजांच्या कालावधीत शेतातील कामे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे तसेच यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या गर्दीचे आयोजन पुढे ढकलण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.