लग्नसराईत सोनं महागच; दर स्थिर, पण चांदीत मोठी घसरण
जळगाव – सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. मात्र, सोन्याच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. सोन्याचा दर प्रति तोळा दीड लाखांच्या पुढे गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अशातच आज बाजारातून काहीसं मिश्र चित्र समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत होते. मात्र, आज सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला असला, तरी उच्च दरांमुळे खरेदीबाबत अनेकजण सध्या थांबून पाहण्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येते.
दुसरीकडे, चांदीच्या दरात आज मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. चांदीच्या किमतीत तब्बल १० हजार रुपयांची घट होऊन दर प्रति किलो २,६५,००० रुपयांवर आला आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी चांदीची भांडी किंवा दागिने घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही अनुकूल संधी ठरत आहे.