यावलमध्ये गॅस डिलिव्हरीत ‘सर्व्हिस चार्ज’च्या नावाखाली जादा वसुली; ग्राहकांत संताप
जळगाव – यावल शहरातील चंदन गॅस एजन्सीमार्फत गॅस वितरण करताना ग्राहकांकडून होत असलेली जादा वसुली थांबण्याचे नाव घेत नाही. गॅस सिलिंडर घरपोच देताना निश्चित किमतीपेक्षा अधिक पैसे घेतले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरत आहे.
‘सर्व्हिस चार्ज’च्या नावाखाली अतिरिक्त वसुली
माहितीनुसार, भारत गॅसचे सिलिंडर पोहोचवणारे डिलिव्हरी बॉय प्रत्येक ग्राहकाकडून २० ते २५ रुपये अतिरिक्त आकारत आहेत. याबाबत विचारणा केल्यास “हा सर्व्हिस चार्ज आहे” असे सांगितले जाते. मात्र, या रकमेबाबत कोणतीही अधिकृत पावती दिली जात नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, गॅस सिलिंडरच्या अधिकृत दरामध्ये घरपोच सेवेचा खर्च आधीच समाविष्ट असतो. तरीही अनेक वर्षांपासून अशी अनधिकृत वसुली सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
