वीज खांबावर काम करताना तरुणाचा मृत्यू; जामनेरमध्ये दुर्दैवी घटना
जामनेर : शहरातील महावितरण कार्यालयासमोर रविवारी रात्री अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वीज खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून एका २० वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला. सागर इंगळे असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर इंगळे हा एका कंत्राटदाराकडे मजूर म्हणून काम करत होता. रविवारी रात्री जामनेर वीज कार्यालयाजवळील वीज खांबावरील दुरुस्तीची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली होती. काम सुरू करण्यापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य रोहित्राचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.

मात्र, संबंधित वीज खांबावर गावातील स्ट्रीट लाईट आणि रोहित्र असे दोन वेगवेगळे ‘कट पॉईंट’ असल्याने स्ट्रीट लाईटचा वीजप्रवाह सुरूच राहिला. याची माहिती कामगारांना नसल्याने मोठा अपघात घडला.
सागर दुरुस्तीचे काम करण्यासाठी खांबावर चढला असता, अचानक सुरू असलेल्या स्ट्रीट लाईटच्या तारांचा त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की तो सुमारे नऊ मीटर उंचीवरून खाली कोसळला. खाली पडताना जवळील दगडावर त्याचे डोके आदळल्याने तो गंभीर जखमी झाला.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.