DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने घेतला चिमुकल्याचा बळी

भुसावळ शहरात संतापाची लाट; नागरिकांकडून नगरपरिषद प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप

भुसावळ : शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता जीवघेणा ठरत असून नारायण नगर परिसरातील एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षीय तारकेश विशाल झोपे या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास तारकेश हा शाळेकडे जात असताना नारायण नगर परिसरात एका कुत्र्याने त्याच्यावर अचानक झडप घातली. या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर व नाकावर गंभीर जखमा झाल्या. जखमा गंभीर असल्याने त्याच्या चेहऱ्यावर तब्बल ८० टाके घालावे लागल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर त्याच्यावर जळगाव येथील शिल्पा हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीराज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबई येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिरूड कॉलनी, रिंग रोड, म्हाडा कॉलनी, गणेश कॉलनीसह अनेक भागांत मोकाट कुत्र्यांची टोळकी नागरिकांच्या अंगावर धावत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत.

दरम्यान, संबंधित हल्ला हा नारायण नगरातील प्रकाश कोळी उर्फ खन्ना यांच्या पाळीव कुत्र्याने केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. घटनेनंतर नगरपरिषद कर्मचारी दीपक बारसे व त्यांच्या पथकाने संबंधितांच्या घरातून पाच कुत्री ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, नसबंदी मोहीम आणि शहरातील स्वच्छतेबाबत तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.