DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मे महिन्यातच उष्णतेचा कहर; अकोला-जळगावचा पारा ४५ अंशांच्या पार

राज्यात उकाड्याने नागरिक हैराण; हवामान विभागाचा अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : मे महिन्याच्या मध्यावरच राज्यात उष्णतेची तीव्र लाट उसळली असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचे चित्र असून अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल जळगावचा पारा सलग चौथ्या दिवशी ४५.५ अंशांवर स्थिरावला असून नागरिक उष्णतेने त्रस्त झाले आहेत.

दिवसभर अंगाची लाही-लाही करणारा उकाडा आणि रात्रीही कायम असलेली उष्णता यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या तापमानामुळे घशाला कोरड पडत असून नागरिक वारंवार पाणी पिण्यास भाग पडत आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे नागरिक टाळत आहेत.

अद्याप मे महिन्याचा मध्य सुरू असतानाच तापमानाने उच्चांक गाठल्याने आगामी दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते ‘अल निनो’चा प्रभाव राज्यात स्पष्टपणे जाणवू लागला आहे.

दरम्यान, राज्यात उष्णतेची लाट असताना महाबळेश्वर हे पर्यटकांसाठी दिलासादायक ठरत आहे. थंड हवेच्या ठिकाणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे किमान तापमान ३२.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले असून पर्यटकांचा ओढा वाढताना दिसत आहे.

हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी १३ व १४ मे रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच विदर्भात १३ ते १९ मेदरम्यान उष्णतेसोबतच काही भागांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली, तर विदर्भात हवामान कोरडे राहिले. मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सियस)
अकोला – ४५.६, जळगाव – ४५.५, अमरावती – ४५.४, बीड – ४४.०, वर्धा – ४४.२, मालेगाव – ४३.८, छत्रपती संभाजीनगर – ४३.६, पुणे – ४०.८, नाशिक – ४१.२, मुंबई (कुलाबा) – ३४.८, महाबळेश्वर – ३२.६. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.