तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे ७ मोठे निर्णय; मंत्र्यांच्या ताफ्यापासून विदेश दौऱ्यांवरही निर्बंध
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळासाठीच 7 मोठे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांनी उच्च स्तरीय बैठकीय या निर्णयांची घोषणा केली. या निर्णयांमुळे आता मंत्र्यांकडून वापर केल्या जाणाऱ्या विविध सुविधांवर परिणाम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे निर्णय घेतले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन उच्चस्तरिय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले. या बैठकांना मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जे प्रमुख निर्णय घेण्यात आले, ते पुढीलप्रमाणे…
१) मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची असेल.
२) मंत्री-अधिकार्यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत.
३) मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा.
४) मंत्री-अधिकारी यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा.
५) अधिकार्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात.
६) शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा कोटेकोरपणे आढावा घेण्यात यावा.
७) ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाई वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशातील जनतेला महत्त्वाचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर मोलाचं आवाहन केलं आहे. मध्य पूर्वेत सुरु असलेल्या संघर्षांमुळे हार्मुझची सामुद्रधुनी बंद झाली आहे. भारताला तेल पुरवठा केल्या जाणाऱ्या देशांमधून येणारी जहाजे याच सामुद्रधुनीतून प्रवास करत भारताच्या दिशेला यायची. पण ही सामुद्रधुनी आता युद्धामुळे बंद असल्याने जगात तेलाचे भाव भडकले आहेत. परिणामी तेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत तेल खरेदी करण्यासाठी भारताचे परकीय चलन जास्त खर्च होत आहे. यामुळे देशाचं परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
देशाचं परकीय चलन वाचावे यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला वर्षभर सोने खरेदी करु नये असं आवाहन केलं आहे. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलचा वापर काळजीपूर्वक आणि काटकसरीने करण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्याऐवजी इलेक्ट्रिक गाड्या वापरण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. यासोबतच खासगी वाहनांच्या ऐवजी मेट्रो आणि इलेक्ट्रिक बसने प्रवास करण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. सार्वजनिक वाहतुकीचे वाहन वापरण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. यासोबतच वर्क फ्रॉम होम काम करण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे.