DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात प्रेमप्रकरणातून तरुणाची रेल्वेखाली उडी; आईसोबतचा शेवटचा कॉल ठरला महत्त्वाचा पुरावा

जळगाव – शहरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली. प्रेमप्रकरणातून घर सोडून गेलेल्या १९ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली. गणेश कोळी असे मृत तरुणाचे नाव असून, आत्महत्येपूर्वी त्याचा आईसोबत सुरू असलेला मोबाईल कॉल हा आता तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.

माहितीनुसार, गणेश कोळी याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही ४ मे रोजी घरातून निघून गेले होते. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी दोघे जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांना फोन करून जळगावला आल्याची माहिती दिली. काही वेळातच तरुणीचे नातेवाईक रेल्वे स्थानकावर आले आणि तिला सोबत घेऊन गेले.

तरुणीला घेऊन गेल्यानंतर गणेशने आपल्या आईला फोन केला. बोलताना त्याने आपण मोठी चूक केल्याचे सांगत हा शेवटचा कॉल असल्याचे म्हटले. त्याचवेळी त्याने सोशल मीडियावर तरुणीसोबतचा फोटो शेअर करत “माय वाईफ माय जान” असे स्टेटस ठेवले होते. आईसोबत संवाद सुरू असतानाच त्याने छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेतली.

विशेष म्हणजे, घटनेनंतरही मोबाईल कॉल सुरूच होता. रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी मोबाईल उचलला असता, पलीकडून त्याची आई बोलत असल्याचे समोर आले. त्यामुळे संपूर्ण प्रकाराचा थरारक घटनाक्रम मोबाईल कॉलमध्ये रेकॉर्ड झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनेनंतर गणेशच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. मुलीच्या नातेवाईकांकडून धमक्या व मानसिक दबाव टाकण्यात आल्याचा दावा करत, त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.