DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; ‘TWJ असोसिएट्स’चा जळगाव प्रमुख जेरबंद

जळगाव – जळगावमध्ये शेअर मार्केट गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा मोठा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ‘TWJ असोसिएट्स’च्या जळगाव शाखेचा प्रमुख मिलिंद शालिकराव पाटील (वय ४१) याला अटक केली असून, कंपनीच्या मुख्य संचालकांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस तपासानुसार, आरोपींनी २७९ गुंतवणूकदारांकडून तब्बल २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपये उकळून त्यांची फसवणूक केली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल, असे सांगून अनेकांना या योजनेत सहभागी करण्यात आले होते.

विशेष बाब म्हणजे, मिलिंद पाटील याने सुरुवातीला कंपनीच्या मुख्य संचालकांविरोधात तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेने सखोल चौकशी केली असता, तो स्वतःच या फसवणूक प्रकरणात सक्रिय सहभागी असल्याचे समोर आले. जळगाव शाखेचा फ्रेंचायझी प्रमुख म्हणून तो गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारणे, करारनामे तयार करणे आणि त्याबदल्यात कमिशन घेणे अशी कामे करत असल्याचे निष्पन्न झाले.

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत आरोपींनी विविध सेमिनार आयोजित करून गुंतवणूकदारांना आकर्षित केले. सेबीच्या नियमांचे उल्लंघन करत ११ महिन्यांच्या मुदतीसाठी ठेवी स्वीकारण्यात आल्या. मात्र मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांना परतावा न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी पाळधी येथील भरत रतीलाल पवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच ‘बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स ॲक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांच्याविरोधात राज्यातील विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर येथेही त्यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे. सध्या दोघेही नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून, जळगाव पोलीस त्यांचा ताबा घेण्याच्या तयारीत आहेत.

या घोटाळ्याचा तपास सपोनि गणेश फड आणि त्यांचे पथक करीत आहे. दरम्यान, ज्या गुंतवणूकदारांनी ‘TWJ असोसिएट्स’च्या जळगाव शाखेत गुंतवणूक केली आहे, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.