जळगावात सोन्याने घेतली उसळी; चांदी महागल्याने वाण खरेदीवर परिणाम
जळगाव : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता सोन्या-चांदीच्या किमतींनीही सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. सोमवारी जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल ५०० रुपयांची वाढ नोंदवली गेली. काल १ लाख ५६ हजार ५०० रुपये असलेले सोन्याचे दर आज १ लाख ५७ हजार रुपयांवर पोहोचले. मात्र चांदीचे दर कालच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत.
दरम्यान, अधिकमास (पुरुषोत्तम मास) सुरू असल्याने बाजारात चांदीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. हिंदू परंपरेनुसार या काळात सासरकडून लेक-जावयाला चांदीच्या वस्तू ‘वाण’ म्हणून दिल्या जातात. मात्र चांदीच्या वाढलेल्या किमतींमुळे ही परंपरा पाळताना अनेक कुटुंबांचे आर्थिक बजेट ढासळत आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत चांदीच्या दरात तब्बल एक लाख रुपयांपेक्षा अधिक वाढ झाल्याने ग्राहक महागड्या वस्तूंऐवजी कमी वजनाच्या आणि परवडणाऱ्या पर्यायांना पसंती देत आहेत. अधिकमासामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली असली तरी वाढत्या दरांमुळे खरेदीवर मर्यादा येत असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.