पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
पत्रकार संघ व प्रज्ञावंत फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी समाजाच्या वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले होते. या नैसर्गिक आपत्तीनंतर तातडीने पूरग्रस्तांना अत्यावश्यक मदत पोहोचविण्यात आली होती. त्याच सामाजिक बांधिलकीचा पुढचा टप्पा म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आणि प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा प्रज्ञावंत फाउंडेशनचे संचालक प्रविण सपकाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक साहित्याचा आनंद व्यक्त केला. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. संकटाच्या काळात समाजाने एकजुटीने पुढे येत गरजूंना मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.