जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअॅक्टर्सचे उद्घाटन
जळगाव : जगातील सर्वात मोठी सूक्ष्म सिंचन प्रणाली पुरवठादार आणि शाश्वत शेती क्षेत्रातील जागतिक अग्रणी कंपनी जैन इरिगेशनने आपल्या भागीदारांच्या सहकार्याने जळगाव येथे सुमारे 20,000 टन वार्षिक क्षमता असलेला अत्याधुनिक औद्योगिक स्तरावरील बायोचार प्रकल्प कार्यान्वित केला आहे. हा प्रकल्प हवामान-स्मार्ट शेती, परिपत्रक उत्पादन व्यवस्था (Circular Manufacturing) आणि व्यावसायिक स्तरावरील कार्बन निर्मूलनाला चालना देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. या अभिनव प्रकल्पाची रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठी जैन इरिगेशनने जागतिक तज्ज्ञांसोबत काम केले आहे.
दररोज 50 मेट्रिक टनांहून अधिक कृषी व फळप्रक्रिया अवशेषांवर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला जळगाव प्रकल्प हा जगातील सर्वात मोठ्या एकल बायोचार रिअॅ क्टर्सपैकी एक मानला जातो. त्यामुळे जागतिक बायोचार आणि कार्बन निर्मूलन चळवळीत भारताचे स्थान अधिक बळकट झाले आहे. जळगाव येथील हा प्रकल्प अनेक नियोजित बायोचार रिअॅक्टर्समधील पहिला असून, अशाच आणखी प्रकल्पांच्या उभारणीचे काम सध्या सुरू आहे.

बायोचार म्हणजे काय?
बायोचार हा कार्बनयुक्त, स्थिर आणि मातीसाठी उपयुक्त पदार्थ आहे. कृषी अवशेषांना कमी ऑक्सिजनच्या वातावरणात उष्णता देऊन (पायरोलिसिस प्रक्रियेद्वारे) तो तयार केला जातो. पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी त्यांचे बायोचारमध्ये रूपांतर केल्याने कार्बन शेकडो वर्षांसाठी सुरक्षितपणे साठवला जातो आणि जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे बायोचारला कार्बन डायऑक्साइड निर्मूलनाचा (CDR) सर्वात विश्वासार्ह आणि टिकाऊ पर्याय मानले जाते.
शेतातून पुन्हा शेतात : परिपत्रक अर्थव्यवस्थेचा आदर्श
प्रकल्पामुळे शेतीतील अवशेषांचे मौल्यवान बायोचारमध्ये रूपांतर करून ते पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनीत वापरले जाणार आहे. यामुळे जमिनीची सुपीकता वाढेल, पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारेल, हवामान बदलास तोंड देणारी शेती विकसित होईल, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होईल. जैन इरिगेशनचे सूक्ष्म सिंचन, रोपवाटिका, कृषी प्रक्रिया आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील मजबूत वितरण जाळे बायोचार थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास सक्षम आहे. भारतातील इतर कोणत्याही बायोचार उत्पादकाकडे अशी मजबूत “लास्ट माईल” क्षमता उपलब्ध नाही.
भारतासाठी मोठी संधी
भारतामध्ये दरवर्षी 50 कोटी टनांहून अधिक कृषी अवशेष निर्माण होतात, ज्यातील मोठा भाग खुल्या जागेत जाळला जातो. जैन इरिगेशनचा हा प्रकल्प या समस्येला आर्थिक संधीत रूपांतरित करणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
क्षमता: दररोज 50 टनांहून अधिक कृषी व फळप्रक्रिया अवशेषांवर प्रक्रिया
वार्षिक प्रक्रिया: सुमारे 20,000 टन अवशेष
जागतिक दर्जा: जगातील सर्वात मोठ्या एकल बायोचार रिअॅक्टर्सपैकी एक
कार्बन निर्मूलन: शेकडो वर्षांसाठी टिकाऊ कार्बन साठवणूक
शेतकरी नेटवर्क: 120 पेक्षा अधिक देशांतील 1 कोटींहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत जैन इरिगेशनचे जाळे
प्रकल्पाचे फायदे
शेतकऱ्यांचे दीर्घकालीन उत्पन्न व उत्पादकता वाढ
जैवइंधन संकलन, प्रक्रिया व वितरण क्षेत्रात ग्रामीण रोजगारनिर्मिती
भारताच्या राष्ट्रीय हवामान कृती आराखड्याला (NAPCC) पाठबळ
जागतिक कार्बन बाजारपेठेत शेतकऱ्यांचा सहभाग
हा प्रकल्प कार्बन क्रेडिट्स निर्माण करून शेकडो वर्षांसाठी कार्बन साठवणूक सुनिश्चित करतो. तसेच पऱ्हाटी जाळण्याचे प्रमाण कमी करून मातीतील सेंद्रिय कार्बन आणि पाणी वापर कार्यक्षमता वाढवतो.
“जैन इरिगेशनने उभारलेला हा मोठ्या प्रमाणातील बायोचार प्रकल्प कार्बन डायऑक्साइड निर्मूलन क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या नेतृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आशियातील कृषीप्रधान अर्थव्यवस्थांसाठी बायोचार अत्यंत उपयुक्त असून तो मातीचे आरोग्य, पाणी साठवणूक आणि खतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करतो.”
-अल्विन ली, हेड ऑफ सप्लाय, पुरो.अर्थ, ग्लोबल कार्बन रिमूव्हल रजिस्ट्री
“आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. ‘सर्वांसाठी मूल्यनिर्मिती’ हे तत्त्व आमच्या कार्याच्या केंद्रस्थानी आहे. हा प्रकल्प केवळ तंत्रज्ञानापुरता मर्यादित नसून कृषी मूल्यसाखळीची नव्याने कल्पना साकारतो. कृषी अवशेषांना मौल्यवान संसाधनात रूपांतरित करून आम्ही शेतकरी आणि इतर सर्व भागधारकांसाठी लाभदायी अशी परिपत्रक व्यवस्था उभी करत आहोत.”
अनिल जैन, व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन