DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

बारडोली बस दुर्घटनेत पाचोरा येथील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा  : गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली येथे झालेल्या भीषण बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील प्रवासी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. मधुकर यशवंत पाटील आणि त्यांच्या पत्नी अर्चना मधुकर पाटील यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मधुकर पाटील आणि अर्चना पाटील हे पाचोरा येथून सुरतकडे प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने अनेक प्रवासी आगीत होरपळले. त्यामध्ये पाटील दाम्पत्याचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची तीव्रता आणि लागलेल्या आगीमुळे काही मृतदेहांची ओळख पटविणे कठीण झाले आहे. त्यामुळे पाटील दाम्पत्याच्या मृतदेहांची अधिकृत ओळख डीएनए चाचणीद्वारे निश्चित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी या दुर्घटनेत जामनेर–सुरत मार्गावरील एसटी बसचे चालक घनश्याम बरकले यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. आता पाचोरा येथील दाम्पत्याच्या मृत्यूची भर पडल्याने जळगाव जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, काही मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसल्याने त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील आणखी काही प्रवाशांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून नातेवाईकांशी संपर्क साधण्यासह मदतकार्यही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.