DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय; यंदाचा मान्सून राहणार प्रभावाखाली?

डिसेंबरपर्यंत तीव्रता वाढण्याचा अंदाज; महाराष्ट्रासह देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

मुंबई : प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागर व वातावरणीय प्रशासनाच्या (NOAA) क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (CPC) केली आहे. आगामी काही महिन्यांत एल निनोची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, डिसेंबरपर्यंत तो अतितीव्र स्वरूप धारण करू शकतो. १९५० नंतरच्या नोंदींमधील हा सर्वाधिक तीव्र एल निनो ठरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

सीपीसीच्या अहवालानुसार, गेल्या काही आठवड्यांमध्ये प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ झाल्याने एल निनोची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा प्रभाव २०२७ च्या सुरुवातीपर्यंत कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

एल निनोचा थेट परिणाम जगभरातील हवामानावर होत असून भारतीय मान्सूनवरही त्याचा मोठा प्रभाव पडतो. सामान्यतः तीव्र एल निनोच्या काळात भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात काही भागांमध्ये पर्जन्यमान घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितले की, जून महिन्यात एल निनो सक्रिय होण्याचा अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात आला होता. आता प्रशांत महासागरातील तापमानातील बदल लक्षात घेता त्याला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. डिसेंबरपर्यंत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, यंदाचा संपूर्ण मान्सून हंगाम एल निनोच्या प्रभावाखाली राहू शकतो.

त्यांच्या मते, एल निनो अतितीव्र झाल्यास समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा दोन ते अडीच अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. अशा परिस्थितीत मान्सूनचा वेग, सक्रिय आणि विश्रांतीचा कालावधी (ब्रेक पीरियड) यावरही परिणाम होण्याची शक्यता असते.

भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या पावसाबाबत सरासरीच्या सुमारे ९० टक्के पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र पावसाचे प्रादेशिक वितरण समान राहीलच असे नाही. ज्या भागांमध्ये आधीच कमी पाऊस पडतो, त्या ठिकाणी पर्जन्यमानात अधिक घट झाल्यास दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

त्यामुळे यंदाचा मान्सून आणि शेती क्षेत्रासाठी एल निनोचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार असून, हवामानातील घडामोडींवर शेतकरी व प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.