अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकम यांची एन्ट्री
महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी तपास वेगात; एसआयटीकडून सखोल चौकशी सुरू
मुंबई : अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील न्यायालयीन लढाईसाठी राज्य शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
पीडित महिलांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी अशोक खरात याला अटक केली असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपविण्यात आला आहे. एसआयटीने आरोपीच्या कार्यालय आणि फार्महाऊसची तपासणी करून विविध पुरावे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

तपासादरम्यान महिलांच्या कथित लैंगिक शोषणाशी संबंधित १०० हून अधिक व्हिडिओ आढळल्याची माहिती तपास यंत्रणांकडून समोर आली आहे. या प्रकरणी अशोक खरात याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार, फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवी, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, आरोपीचे काही राजकीय व्यक्ती आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंध असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र या संदर्भातील बाबींची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे या प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.