DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

११ जुलैसाठी हवामान विभागाचा हाय अलर्ट; महाराष्ट्रात यलो अलर्ट कायम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि नागरिकांची गैरसोय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पालघर, नाशिक, पुणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने शनिवार, ११ जुलैसाठी देशातील सुमारे २० राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. काही भागांत ताशी ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत उत्तर भारतात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पूर्व भारतातही मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच खराब हवामानामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा धोका असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात यलो अलर्ट

महाराष्ट्रातही पावसाचा जोर अद्याप कायम असून अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. पुणे जिल्हा, घाटमाथ्याचा परिसर तसेच सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.