जळगाव वाहतूक शाखेची धडक कारवाई; ४८ अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर गुन्हे
जळगाव : शहरातील वाहतूक शिस्त अबाधित राखण्यासाठी आणि अल्पवयीन मुलांकडून होणारे वाहनचालन रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून ४८ अल्पवयीन दुचाकीस्वारांच्या पालकांवर कायदेशीर कारवाई केली. या कारवाईत एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक, मा. अपर पोलीस अधीक्षक तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मोटार वाहन अधिनियमांतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे एक अधिकारी आणि आठ अंमलदार यांनी शहरातील विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवून अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली.

कारवाईनंतर संबंधित अल्पवयीन मुलांच्या पालकांना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलावून समुपदेशन करण्यात आले. यापुढे अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा अन्य वाहन चालविण्यास देऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आल्या.
शहर वाहतूक शाखेने यापुढेही अशी धडक मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर तसेच संबंधित वाहनमालकांवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
वाहतूक नियमांचे पालन वाढविणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर लक्ष्मणराव पेंदाम यांनी दिली.