DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शनिपेठ पोलिसांनी रोखले दोन बालविवाह; कायदा मोडणाऱ्यांना थेट जेलचा इशारा

जळगाव : शनिपेठ पोलीस ठाण्याने बालविवाह प्रतिबंधासाठी धडक कारवाई करत २२ जून २०२६ रोजी जामुना नगर परिसरातील आणि १० जुलै २०२६ रोजी कांचन नगर येथील बिंदुबाई हॉलमध्ये होणारे असे दोन बालविवाह यशस्वीरित्या रोखले आहेत.

या कारवाईनंतर शनिपेठ पोलीसांनी आपल्या हद्दीत बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून, भविष्यात बालविवाह करण्याचा प्रयत्न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना किंवा समुपदेशन न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशारा दिला आहे.

पोलीसांनी स्पष्ट केले की, विवाहासाठी मुलीचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे किमान वय २१ वर्षे असणे कायद्याने बंधनकारक आहे. अन्यथा संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.

या प्रकरणात केवळ वधू-वरांचे पालकच नव्हे, तर विवाहाला संमती देणारे नातेवाईक, विवाह लावणारे पुरोहित अथवा काझी, मंडप डेकोरेटर्स, बँड पथक, वाजंत्री तसेच छायाचित्रकार यांनाही सहआरोपी करण्यात येणार असून त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. गुन्हा सिद्ध झाल्यास दोषींना दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरी, एक लाख रुपयांपर्यंत दंड तसेच संबंधित व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.

हा केवळ जनजागृतीचा संदेश नसून भविष्यातील कठोर कायदेशीर चेतावणी असल्याचे सांगत शनिपेठ पोलीसांनी बालविवाह रोखण्यासाठी २४ तास विशेष पथक कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली मपोउनि प्रिया दातीर, परिपोउनि संतोष खेडकर, परिपोउनि अभिषेक कटारे तसेच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.