अनैतिक संबंधाच्या संशयातून खून; दोन आरोपी २४ तासांत जेरबंद
रावेर : रावेर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना रावेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) जळगावच्या पथकाने अवघ्या २४ तासांत शोधून अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १७ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेख सलमान शेख शब्बीर (वय २७, रा. ऐनपूर, ता. रावेर, ह.मु. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मोठा भाऊ शेख कुर्बान शेख शब्बीर (वय ३०) याचा खून झाल्याचे समोर आले.
पोलीस तपासात आरोपी गणेश विजय उर्फ संजय घोरपडे (वय २५, रा. भोर रेल्वे स्टेशन, रावेर) याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कारणावरून दोघांमध्ये यापूर्वी वाद झाला होता. त्यावेळी आरोपीने मयताला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख फिर्यादीत आहे.
या पूर्ववैमनस्यातून गणेश घोरपडे व मेघराज वसंत सांगळे (वय ३१, रा. भोर रेल्वे स्टेशन, रावेर) यांनी संगनमत करून मयताला दारू पाजली. त्यानंतर ९ जुलै ते ११ जुलैदरम्यान नांदुरखेडा शिवारातील गट क्रमांक ९६ मधील शेतात गळा दाबून त्याचा खून करून आरोपी फरार झाले, असे तपासात निष्पन्न झाले.
गुन्हा दाखल होताच रावेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने दोन्ही आरोपींचा अवघ्या २४ तासांत शोध घेत त्यांना अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची तोंडी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच रावेर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.