DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

हजारो वारकऱ्यांच्या विठ्ठलनामाच्या गजरात ‘विठाई एक्सप्रेस’चे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे भक्तिमय प्रस्थान

चाळीसगाव | प्रतिनिधी

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून सलग सहाव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या चाळीसगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर विशेष रेल्वे वारीचा प्रस्थान सोहळा शनिवारी सायंकाळी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे माऊलींच्या पालखीचे विधिवत पूजन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी जळगाव लोकसभेच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. संजयदादा पवार, चाळीसगाव नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी वारकरी माता-भगिनींशी संवाद साधत त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. पंढरपूर वारीची परंपरा, वारकरी संप्रदायाचे महत्त्व आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

यानंतर टाळ-मृदंग, वीणा, अभंग आणि “राम कृष्ण हरी”, “जय हरी माऊली”च्या अखंड गजरात माऊलींच्या पालखीची मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानातून चाळीसगाव रेल्वे स्थानकाकडे रवाना झाली. संपूर्ण मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

चाळीसगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर वारकरी भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने विशेष रेल्वेत प्रवेश केला. ज्येष्ठ नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक डब्यात मदतीसाठी सज्ज होते.

विशेष रेल्वेला हिरवा झेंडा मिळाल्यानंतर विठ्ठलनामाच्या अखंड गजरात ‘विठाई एक्सप्रेस’ श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. रेल्वे सुरू होताच प्रत्येक डब्यात वारकरी भाविकांनी घरून प्रेमाने आणलेल्या शिदोरीचा एकमेकांसोबत आनंदाने आस्वाद घेतला. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी प्रत्येक बोगीत जाऊन वारकरी माता-भगिनी व ज्येष्ठ नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या शेजारी बसून त्यांनी प्रेमाने वाढलेल्या मीठ-भाकरीसह घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. आपला आमदार आपल्या सोबत बसून आपुलकीने संवाद साधत असल्याचे पाहून वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.

विशेष रेल्वेतील संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग, भजन आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर सुरू असताना हजारो वारकरी भक्तिभावाने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.