DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा आज…

जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन व पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते नूतन पंचायत समिती इमारतीसह विविध विकासकामांचे लोकार्पण, आरटीओ कार्यालयाचे भूमिपूजन

चाळीसगाव |  आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव शहर व तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या विविध विकासकामांचे लोकार्पण व उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज, सोमवार (दि. २७ जुलै) जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५.३० वाजता टाकळी प्र. चा. येथील २१.३२ कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पणाने होईल. त्यानंतर वीर सावरकर चौकातील सह दुय्यम निबंधक कार्यालय, करगाव रेल्वे बोगदा रोड येथील प्रांताधिकारी कार्यालय व प्रांताधिकारी-तहसीलदार निवासस्थाने, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी निवासस्थाने, स्टेशन रोड येथील’रायगड’ व्हीआयपी शासकीय विश्रामगृह आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी निवासस्थाने यांचे लोकार्पण विविध ठिकाणी होणार आहे.

मुख्य कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता नूतन पंचायत समिती कार्यालय इमारत, कोर्टाच्या बाजूला होईल. यावेळी ९.०५ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेल्या नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण तसेच २६ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक आरटीओ कार्यालयाच्या इमारतीचे इ भूमिपूजन करण्यात येणार आहे.

या विकासकामांमुळे ग्रामीण प्रशासनासाठी आधुनिक पंचायत समिती इमारत, महसूल विभागासाठी सुसज्ज प्रांत कार्यालय, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, दस्त नोंदणीसाठी आधुनिक उप निबंधक कार्यालय, व्हीआयपी विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने तसेच टाकळी प्र. चा. गावासाठी शाश्वत पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या सर्व विकासकामांमुळे चाळीसगावच्या प्रशासकीय, आरोग्य, पायाभूत आणि ग्रामीण विकासाला नवी गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली आहे, या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.